माणूस का दगड?



"आदी... अरे आदी... बघ रे तुझ्या पोरीला, घे जरा... खूपच रडतीये. माझ्याकडून पण शांत नाही होते. तिची आई डॉक्टरकडे गेलीये माझे रिपोर्ट्स आणायला... आणि मला जेवणाचं बघायचंय...कुकर लावून येते तोपर्यंत बघ हिला!"
आदी - "दे आई...
ये ग माझी सोनू.. का लडती तू? का झाल तुला?" असं म्हणून आदित्य त्याच्या ९ महिन्याच्या मुलीला खेळवायला लागला.
तोच त्याचे बाबा आले... "काय... परत रडणं सुरु झालं वाटत? शांत कर रे... तिला शांत कर... धपाटा घाल हवं तर. पण गप कर!
तुझ्यावरच गेलीये बघ... तू पण लहानपणी सारखा रडायचा!"

"हो.... लहान बाळ होतो ना... रडणारच... आणि मग तुम्ही द्यायचा धपाटा आणि म्हणायचा, 'मुलांनी रडायचं नसत!'
आठवतंय मला. पण मला सांगा, काय प्रॉब्लेम आहे रडण्यात? का नाही चांगलं रडणं? लहानपणापासून ऐकत आलोय... 'रडणं बंद कर, बोलणं कमी कर, चिडणं बंद कर... नशीबच म्हणायचं, 'श्वास घेणं बंद कर नाही' म्हणालात कधी. मान्य आहे ना मुलगा आहे ते. पण त्याही आधी एक माणूस आहे हो! आणि माणूस म्हटलं कि मन, भावना, इमोशन्स येतातच ना... पण नाही... तू इमोशनलसुद्धा होऊ नको. तू मनातलं बोलू नको. तू रडू नको. तू चिडू नको. तू तुझ्या इच्छा पूर्ण करू नको. तू सगळ्या इच्छा मार. हो कि नाही?
पण कधी तरी विचार केलाय का हो, काय वाटलं असेल आणि काय परिणाम झाला असेल माझ्यावर? सगळे म्हणायचे 'आदी खूप रडतो...' म्हणून मी रडणं बंद केलं. ठीक आहे. मग म्हणायला लागले 'आदी बोलतो...' मी बोलणं बंद केलं. नंतर काय तर 'आदी चिडतो...' चिडणं सुद्धा बंद केलं हो... पण हे सगळं झाल्यानंतर हे मात्र कधी नाही लक्षात आलं तुमच्या कि माझं 'हसणं' पण कमी झालय; हे नाही लक्षात आलं कि माझं लोकांवर 'विश्वास' ठेवणं कमी झालाय. कमी कसलं, बंदच झालाय म्हणा कि...  नाही विचार केला कधी एक मुलगा, एक पुरुष जरी असलो तरी 'मन' आहे. मन काय बायका-पुरुष बघून बदलत नाही ना शरीरासारखं... मन मनच असतं!
'आमचा आदित्य... हुशार, स्मार्ट, स्पोर्ट्समध्ये पण आहे... चांगल्या पगाराचा जॉब आहे... सेटल आहे, सगळ्यांचा आदर करतो, आई-वडिलांची काळजी घेतो... अगदी श्रावण बाळच... सगळ्यांचा लाडका... 'खूप चांगला!' पण या सगळ्या दिखाव्यामध्ये आणि 'लोग क्या कहेंगे?' या प्रश्नाच्या पुढे तुम्हाला मात्र तुमचा मुलगा कधीच नाही कळला. आपल्या मुलाला चांगलं बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये 'खरं राहणं, आपण जसे आहोत तसे जगणं' शिकवायला आणि सांगायला मात्र विसरूनच गेला. का नाही मला कधी मनातलं बोलू दिलं? का नाही म्हणत कधी कोणी कि 'पुरुष आहेस म्हणजे इमोशनलेस आहे असं नाही.' 
जरा मोकळेपणानं जगलो असतो. आतल्या आत स्वतःला दाबून नसतं ठेवलं कधी. मनात साठवून नसतं ठेवलं. कोणावर तरी विश्वास ठेवला असता.
माझे विचार, राग, बोलणं, फीलिंग्स, सगळं सगळं फक्त आणि फक्त मनातच राहिलय हो बाबा... आणि ते आता इतकं भरलं आहे ना कि प्रेम, विश्वास या सगळ्यासाठी जागाच नाही राहिलीये.
माणसाने स्ट्रॉंग असावं, मान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही ना कि त्याच्यामध्ये इमोशन्सच नसावेत, किंवा त्याने मन मोकळं करू नये.
'तू एक मुलगा आहेस, तू स्ट्रॉंग राहायलाच हवं. असं ऐकून ऐकून स्ट्रॉंग झालोय का नाही ते नाही सांगता येणार पण एक 'दगड' झालोय हे नक्कीच सांगू शकतो. 
हो... दगड! माणूस राहिलोच नाहीये मी. कारण माणसाला पुरुष बनवण्याच्या त्या so called गुणधर्मांच्या नादात, तो पुरुष जिवंतपणीच मेला हे कोणाच्याच लक्षात नाही आलं, आणि अजूनही कोणाच्या लक्षात येत नाहीये की तो आता राहिला आहे फक्त एक दगड. एक भरलेला दगड. जो एक तर फुटेल... नाही तर बुडेल."

Comments