तीन तासा पेक्षा जास्त झाले होते मीटिंग सुरू होऊन. आणि पुढे अजून किती तास चालेल काही अंदाज नव्हता. टॉपिक च तसा होता! नवीन प्रोजेक्ट - women empowerment वर हीच बोलत होती. तिलाच दिला होता तो प्रोजेक्ट. Age, health issues, sex, virginity, lesbian, pregnancy, periods सगळ्यावर अगदी बिनधास्त आणि स्पष्ट बोलत होती ती. समोर मॅम, सर, कलिग्स सगळी 22 जणांची टीम बसली होती. पण तिला काही वाटत नव्हतं. ती अतिशय बेधडक आणि स्पष्टपणे तिचे सगळे मुद्दे डिटेलमध्ये मांडत होती आणि तोच....
तो मेसेज आला... आणि एका सेकंड मध्ये तिला पुढे काय होणार हे सगळं डोळ्यासमोर दिसू लागलं. अचानक असल तरी आता याची सवय झाली होती तिला. नऊ वर्ष झाले आता. त्यामुळे सवय होणं गरजेचं होतं अस म्हणायला काही हरकत नव्हती. फरक इतकाच की आता पूर्वीसारखा पटकन मूड नाही चेंज व्हायचा की बाकीच्यांना काही कळेल.
पण आता मात्र लवकरात लवकर मीटिंग संपवावे आणि इथून बाहेर पडावं असं झालं होतं... आणि लकीली मीटिंग संपली. ती पटकन बाहेर आली, फ्रेश झाली. नेहमीप्रमाणे या मेसेजच्या तयारीत होतीच, पण या वेळेस आठ दिवस आधी हा मेसेज येईल हे कॅल्क्युलेशन नव्हत.
पण ठीक आहे... आता काय..? आलाय तो तर आलाय... आणि तो आला आहे म्हणजे ऑफीसमध्ये थांबण्याचा तर जणू काही संबंधच नव्हता. तिने HR ला इन्फॉर्म केलं आणि निघाली.
जशी ती अवेळी किंवा वेळेच्या आधी ऑफिसमधून निघाली तशा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर जात होत्या. चला त्यांचे ठीक आहे हो, ती लवकर निघत आहे म्हणून... पण ऑफिस बाहेर पडल्यावर पण तेच.
सगळ्या नजरा आपल्याकडे बघत आहेत. येणारे-जाणारे... रस्त्याच्या कडेला चहा पिणारे... एक बघणार, आणि लगेच समोरच्याला डोळ्यांनी खुणावणार... मग तोही बघणार. बस स्टॉप वर गेली तर तिथले सगळे सुद्धा बघतायेत. कितीही इरिटेट होत असलं तरी पटकन निघू पण शकत नव्हती. कारण नेहमी कितीही थकली असली तरी बसमध्ये लेडीज सीटवर बसणाऱ्या जेन्ट्सला न उठवणारी आणि उभी राहून प्रवास करणारी ती आज रिकाम्या बसची वाट बघत होती.
आणि बस आली. जागासुद्धा भेटली. पण पुन्हा तेच! बस कंडक्टर, बस मधल्या बायका, पोरं, पोरी सगळेच तिच्याकडे बघतायेत. आपण अस काय पाप केलय ? काय सोनं लागलंय का यार ? अशा अनोळखी चेहऱ्यांच्या अनोळखी नजरा... ज्या नक्की काय म्हणत आहेत ते देखील नीट कळत नाहीये. चांगलं का वाईट?? का मग काही कळलंय त्यांना..??? काही म्हणजे काही नीट समजत नव्हतं...
अश्याच विचारात ती कधी घरी पोहोचली तिला देखील कळलं नाही.
तिची विचारांची तंद्री तुटली ती आईच्या आवाजाने..., "अगं, तू आत्ता लवकर कशी आली घरी?"
तिच्या लवकर येण्याचे कारण काय, ते आईला बरोबर कळलं.
"बरं बरं... ठीक आहे... तू तिकडे जाऊ नको... किचनमध्ये तर अजिबात जाऊ नको... मी देते तुला पाणी... आणि कपडे पण देते. तू तिकडे बाजूला बस!"
म्हणजे सिरियसली......
बाहेरची अजब गजब नजर लोकांची होती का मग आपल्या मनाचे खेळ, की सगळे आपल्यालाच बघत आहेत हे तर तिला कळलं नव्हतं, पण घरात मात्र आपल्याच आईची अशी नजर आणि असं वागणं बघुन ती जाम चिडली. आणि तिचा कंट्रोल सुटला.
ती जोरात ओरडली....
"अरे काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा???
प्रॉब्लेम मला आलाय, पण सगळे असे बघताय जसं काही माझा प्रॉब्लेम हा सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे. हो... आलाय पिरेड! आणि तो येतो! तो येणारच! दर महिन्याला येतो. पण त्याला सहन करण्याशिवाय आमच्याकडे सुद्धा दुसरा कोणता पर्याय नाहीये.
ऑफिस, कॉलेजमध्ये ओढणी मध्ये लपवुन पॅड घेऊन जा... का? तर, कोणी पुरुष माणसाने बघितले तर?
अरे पण घेतलं तर घेतलं! जर तो मेडिकल, किराणा वाला ते विकू शकतो तर आम्ही बिनधास्त त्यांच्याकडे मागू का नाही शकत? दुकानातून पुरुष मंडळी जायची वाट का बघायची? तो सुपरस्टार अक्षय कुमार, पिक्चर साठी स्वतः पॅड घालू शकतो तर तुम्ही काय साधं पडलेल पॅड पण उचलून हातात नाही देऊ शकत का?
आणि समजा... जर कोणी मुलगी दिसत असेल ना भेदरलेली तर तिला बघून अजून भेदरवु नका. दिसत आहे ना कोणाला त्रास होत आहे काही, तर स्वतःहून दिली जागा बसायला तरी चालेल हो!
आणि सगळ्यात हाईट म्हणजे आपल्याच घरात आपणच वाळीत टाकलेल्या पाहुण्यासारख बसून राहायचं. त्याकाळी पीरियड्स आल्यावर बायका-पोरींना बाजूला बसवण्याची प्रथा होती. का? तर, तेव्हा सगळी काम बायकाच करायच्या. पीरियड्स आल्यावर वापरायला पॅड नव्हतं, कापड वापरायची. या चार दिवसांमध्ये पाठ दुखते, पोटात कळा येतात. त्यांना आराम म्हणून बाजूला बसवायचे. पण लोक ऐकणार नाही म्हणून देवाची भीती घातली.
But now time has changed. सगळ्यांना या गोष्टी कळतात. सगळ्या पोरांना कळतं. सगळ्या नवर्यांना कळतं. पण तरीसुद्धा आपण मात्र हवं तेवढं बिनधास्त आणि रिलॅक्स होत नाही.
'अजूनही देवाला हात लावू नको. देवीवर तुझी सावली नको पडायला.
अरे जर देवाला प्रॉब्लेम असता तर का दिला असता आम्हाला दर महिन्याचा प्रॉब्लेम?'
पीरियड्स जेव्हा पहिल्यांदा येतात तेव्हा आई खुश होते, पोरीला भेटवस्तू देते, पुरणपोळीचा स्वयंपाक करते. का, तर आता आपली मुलगी भविष्यात प्रेग्नेंट राहू शकते. तीच लग्न होऊ शकत या विचाराने. पण तीच आई, महिन्याला पीरियड्स आले की तोंड पाडते आणि "आलं होय तुझं" असं म्हणते.
हात लावू नको म्हणे... दिवसातून दोन वेळा अंघोळ केल्यानंतर आम्ही काय अस्वच्छ आणि घाणेरडे राहतो वाटतं का तुम्हाला ? इथे दहा वेळा टॉयलेट, आठ वेळा बाथरूम आणि चार वेळा पॅड बदलून आमची वाट लागते. आणि तुमचं इथे बसू नको, तिकडे जाऊ नको, असलं चालू असत. दुखत असलं तरी आम्ही सगळं करतो. obviously उपकार नाही करत कुणावर. तो आमचा चॉईस आहे.
म्हणणे फक्त एकच आहे, पीरियड्स ही एक फिजिकल गोष्ट आहे. मेडीकल आहे. सायन्स आहे. त्यांना देवधर्माला जोडून चुकीच्या लावलेल्या रिती, रूढी, misconceptions काढून टाका.
आम्ही नॉर्मलच आहोत जसे इतर दिवशी असतो, आणि आम्हाला नॉर्मलच राहू द्या. आम्हाला पण आवडतं, गणपती मध्ये वरातीत नाचायला. नवरात्रीत दांडिया आणि गरबा खेळायला.
एकटं लांबून बघत बसण काय असतं हे तुम्हाला नाही कळणार!
जाऊदे... तसही एवढी बडबड करून सुद्धा कोणाला काय कळणार आहे? आणि कितीही कळलं तरी काही फरक पडणार आहे का? पुढच्या महिन्यात परत आमची जागा शेवटी घराच्या कोपर्यातच!"

Some things never change in society.. even time has changed technology has advanced but it remains the same..
ReplyDeleteNice blog.. hope it will change the mindset..
Ya... actually... Hoping for good...
ReplyDelete