थांबा जरा...




पळणाऱ्या क्षणांनो तुम्ही थांबा जरा...
चालणाऱ्या पायांनो... तुम्हीही थांबा जरा...
घरात बसून सोशल मीडियावर धावणाऱ्यानो थांबलेल्या जगासोबत थांबा जरा...

बाहेर नका जाऊ पण बाहेर डोकावून बघा जरा...
ट्रॅफिक आणि प्रदूषणाने भरलेले रस्तेसुद्धा शांत आणि शुद्ध झाले आहेत हो...
'नेचर'मध्ये फिरायला न जातासुद्धा खऱ्या निसर्गाचा अनुभव देत आहेत तो अनुभवा जरा...

मनात खूप गोंधळ माजला आहे...
जमलंच तर तो सोडवा जरा...
वेळ आहे भरपूर तर मनातलं थोडं बोलून बघा जरा...

चार भिंतींमध्ये राहणाऱ्या माणसांसोबत बोला जरा...
घर आहे हो, घरासारखं फुलवा त्याला....
मित्रांशी वेळ आहे म्हणून बोलण्यापेक्षा 'आपले' आहे म्हणून बोला जरा...
मनात अडकून राहिलेलं मोकळं करा जरा...

'कोरंटाईम'पेक्षा 'मी टाईम' जगा जरा...
स्वतःसाठीदेखील थोडा टाइम काढा जरा...
फोन, टीव्ही, काम सर्व थांबवून फक्त शांत रहा जरा...

जुने फोटो आणि कपाटं उपसा जरा...
कुठे कोणतं स्वप्न तर नाही ना अडकून राहिलंय? त्याला शोधा जरा...
कामाच्या गडबडीमुळे थांबवलेला छंद पुन्हा लावून घ्या जरा...

कोण जवळ येतंय, कोण दुरावतय या सगळ्यांसोबतच,
आपण आपल्या स्वतःपासून किती दूर किंवा जवळ आहोत ते जाणून घ्या जरा...
कोणाचं काय चुकतंय हे थोडं बाजूला ठेवून
आपल्या स्वतःच कुठे चुकतंय ते थोडं जाणून घ्या जरा....

हे दिवस नाहीत हो पुन्हा येणार...
पण जसे या दिवसात घरात राहिलो तर पुढे सुरक्षित राहू,
तसंच आपल्या माणसांसोबत आणि स्वतःसोबत राहिलो तर पुढे अजून जास्त सुंदर आयुष्य जगू...

म्हणूनच....
पळणाऱ्या क्षणांनो तुम्ही थांबा जरा...

Comments