8-9 वर्षांचा मुलगा आई - बाबांसोबत नवीन फ्लॅट बघायला गेलेला.
बोलत होता - "बाबा... बाबा हे तर आपल्या आत्ताच्या घरापेक्षा पण खूप मोठ्ठ आहे... 3-3 रूम आहेत."
बाबा - आवडलं तुला? हे बघ हा हॉल, ही बेडरूम आणि हे किचन.
मुलगा - बेडरूम माझी... बेडरूम माझी...
बाबा - हो ? आणि मग माझी आणि आईची रूम कोणती?
मुलगा - सोप्पंय... तुमचा हॉल... आणि आईचं किचन.
आईचं किचन....
हो... आईचं किचन...
.
हे असे वाक्य नेहमी नाही पण नक्कीच कधी तरी ऐकली असतीलच तुम्ही. आपण प्रत्येकानेच... अनेक जण नकळत बोलूनही गेले असतील.
खरंच का???
तिची जागा फक्त किचनमध्ये आहे?
तुझी जागा फक्त किचनमध्ये आहे?
"आईला वेगळी रूम कशाला हवी?"
"आईचं हॉलमध्ये काय काम? आई... तू जा किचनमध्ये?"
"आई... तुला मागितलं ना मी, बाबांना का सांगते. तुझं काम आहे, तू पोळी आणून दे!"
"आई तुला घरातली खूप कामं असतात माहीत आहे पण मग अजून कोण करणार? तुझंच कामं आहे ना ते...!"
असे अनेक वाक्य माणूस बोलून जातो पण बोलून गेल्यावर त्याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो याचा नाही विचार करत.
कुठून बोलतात ही मुलं हे सगळं.. नक्कीच कोणाकडून तरी ऐकलं असेल... आपल्या मोठ्यांकडून ऐकलं असेल. त्यांनी त्यांच्या लहानपणी, त्यांच्या मोठ्यांकडून ऐकलं असेल...
हो ना?
पण कधी विचार केला आहे, जी व्यक्ती सगळं न सांगता, मनापासून, प्रेमाने करते तिला हे असं सगळं ऐकल्यावर काय वाटत असेल?
तुम्हीच विचार करा.. कसं वाटेल तुम्हाला जेव्हा तुम्ही खूप मनापासून कामं केलेल्या एका assignment वर कॉलेजच्या Ma'am म्हणतात "हे काय करून ठेवलयस?; कामं केलंच नाहीयेस..." किंवा C grade देतात?
कसं वाटतं जेव्हा खूप मनापासून कामं केलेला प्रोजेक्ट, बॉस Reject करतो किंवा तुमचा insult करतो?
पिढ्यान-पिढ्या तिने बाहेर पडता येत नाही किंवा पडायचं नाही म्हणून खंबीरपणे घरची आणि घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी घेतली आणि पिढ्यान-पिढ्या प्रत्येक जण तिच्या जबाबदारीला तिचा जॉब समजत आले आहे.
पण हा खरंच तिच्या एकटीचा जॉब आहे का?
खायला फक्त तिलाच लागतं?
धुवायला कपडे फक्त तिचेच असतात?
तिला शरीर नाही? ती आजारी पडू शकत नाही?
मुलं फक्त तिचीच आहेत... मान्य आहे की 9 महिने तिने पोटात वाढवले पण म्हणून वडिलांचा, नाव लावण्याशिवाय आणि पैसे कमावून आणण्याशिवाय काही रोल नाही? रक्त तर त्यांचं पण आहे ना?
तिने घर, ऑफिस, फॅमिली सगळं सांभाळायचं... तीच कामं आहे म्हणून?
पण त्याने मात्र घर, ऑफिस, फॅमिली असं सगळं नाही बघायचं... कारण ते त्याचं कामं नाही म्हणून!
लक्षात ठेवा ती सगळ्या जबाबदाऱ्या घेते आणि निभावते कारण तिला माहीत आहे की ती हे करू शकते. तिच्यात emotionally, mentally आणि physically ते सगळं सांभाळण्याची शक्ती आहे... आणि सगळ्यात महत्वाचं ती लहानपणापासून ते बघत आली आहे म्हणून... . ते तिचं कामं आहे म्हणून नाही.
आणि तेच कारण आहे ज्यामुळे वयासोबतच तिची चीड-चीड वाढते, व्याधी लागतात.
अहो 12-15 वर्षांची असल्यापासून दर महिन्याला शरीरातील एव्हडं मोठं रक्त जाणं, त्यामुळे हिमोग्लोबिन कमी होणं; नंतर हाडा-माणसाचा एक मनुष्यप्राणी आपल्या शरीरातून बाहेर काढणं हे काय सोप्प आणि त्रास न देणार वाटतं का? एवढे सगळे बदल शरीरात होत असतील तर वयाच्या आधी शरीर थकणे, व्याधी लागणे, emotionally disturbed होणे साहजिक नाही का?
'तिने जड उचलू नये, शक्ती प्रदर्शनाची कामं करू नये' हे ती करू शकत नाही म्हणून नाही सांगत आले आहेत पूर्वज... तर, शरीरामध्ये सततच्या होणाऱ्या बदलांमुळे तिला कळत-नकळत त्रास होत असतो. अश्या वेळी तिचे शारीरिक कष्ट थोडे तरी आपण कमी करावे या विचाराने 'पुरुष बलवान आहे...स्ट्रॉंग आहे' हे विचार बिंबवले गेले आहेत.
बाकी कोण खरंच physically किती स्ट्रॉंग आहे ते एवढ्याशा सर्दीने सुद्धा कळतच की...
.
असेच न बोलण्यात येणारे अनेक बदल पुरुषांमध्ये पण होत असतात... त्यांना सुद्धा अनेक टेन्शन असतात, जबाबदारी असते... याला दुमत नाहीच!
.
म्हणणं फक्त इतकंच आहे की... ती घरात आहे म्हणून तिला टेन्शन नाही, तिची जागा किचनमध्येच आहे हे विचार चुकीचे आहेत... प्रत्येक कामं तिनेच करावं ही टेंडेंसी चुकीची आहे.
आपली lifestyle, खाण्याची पद्धत, कपडे हे सगळं पिढ्यांप्रमाणे बदललं ना आपण? मग आपले विचार का नाही?
हळू हळू बदल घडत आहेत. पण तो बदल घडवण्यासाठी जाणीव होणे गरजेचे आहे. फक्त तेव्हडी जाणीव करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
जेवायला प्रत्येकाला लागतं मग प्रत्येकाने बनवायला काय हरकत आहे?
ती आणि तो दोघेही working आहेत मग तरीसुद्धा तिलाच का घर आणि ऑफिस असा डबल जॉब?
घर आहे हो आपलं... तिच्या कामाला जॉब नाही तर जबाबदारी समजा. म्हणजे प्रत्येकालाच स्वतःची जबाबदारी कळेल. पुरुषाने घरातल्या कामांमध्ये मदत केली तर लगेच पुरुषार्थ कमी नाही होणार.
"मी पुरुष आहे, मी हे करणार नाही, ते माझं कामं नाही" अश्या विचारांमध्ये पुरुषार्थ नाही...
खरा पुरुषार्थ तर....
.
.
.
जाऊद्या... खरा पुरुषार्थ कश्यात आहे आणि काय आहे हे सांगून काही फायदा नाही कारण अनेकांना समोरच्याला त्याची 'जागा' दाखवून देण्यातच पुरुषार्थ आहे असं वाटतं!
.
असो...
.
.
.
प्रत्येक आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

Comments
Post a Comment